तळेगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सेवा

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे रोटरी क्लबच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अत्याधुनिक आरोग्य सेवेकरिता 16 लाख रुपये खर्च केले जाणार असून रूग्णांना 125 प्रकारच्या चाचण्या मोफत करण्याची सुविधा मिळेल, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष मंगेश गारोळे यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रभाकर गुणे व डॉ. गीता गुणे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष सुनील शेळके होते. क्लब अध्यक्ष मंगेश गारोळे, प्रकल्प अधिकारी महेश महाजन, डॉ. अनंत परांजपे, शशांक ओगले, अतुल शहा, विजय काळोखे, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी आगळे, श्रीराम ढोरे, भावना चव्हाण, वैशाली खळदे, संगीता जाधव, भारती शहा, डॉ.प्रवीण कानडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हे असेल प्रकल्पात
या प्रकल्पात पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी, प्रसुती गृहाचे नूतनीकरण व सुशोभिकरण याशिवाय थायराईट, स्त्री पुरुष वंधत्व, स्त्री रोगाविषयावर आधुनिक चाचण्या यासाठी सुमारे 16 लाख रुपयाचा प्रकल्प उभारणार असल्याचे मंगेश गारोळे यांनी सांगितले. याकरिता डॉ.प्रभाकर गुणे, डॉ.गीता गुणे यांच्या आर्थिक मदती बरोबरच तळेगाव रोटरीचे माजी अध्यक्ष अशोक काळोखे व डॉ. नेहा कुलकर्णी व रोटरी सदस्य यांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. यामुळे रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकेल असा विश्‍वास रोटरी अध्यक्ष मंगेश गारोळे यांनी व्यक्त केला.