तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती करण्यास सुरुवात करून पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई आरंभल्याने मालमत्ता थकबाकीदाराचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकी त्वरित भरावी असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या नियोजनानुसार नगरपरिषदेची मिळकतकर वसुली अभियान वेगाने चालविण्यात येत आहे.
मिळकतदार व थकबाकीदार
वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपरिषदेची एकूण घरपट्टीची मागणी 18 कोटी 97 लाख 7 हजार एवढी आहे. तर पाणीपट्टी 11 कोटी 44 लाख एवढी आहे. त्यापैकी आतापर्यंत या वर्षी 70 टक्के वसुली करण्यात आलेली असून शहरातील सुमारे 200 मोठ्या थकबाकीदाराकडून वसुलीचे प्रयत्न चालले आहेत. संपूर्ण शहरात 28 हजार मिळकतदार आहेत. 22 हजार नळ कनेक्शन आहेत.
पथकात यांचा समावेश
कर वसुलीसाठी कर निरीक्षक विजय भालेराव यांचे सह संभाजी भेगडे, प्रवीण शिंदे, प्रवीण माने, विलास वाघमारे, प्रशांत गायकवाड, तुकाराम मोरमारे, सुनील कदम, विशाल मिंड हे वसुली अधिकारी आपापल्या विभागात वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय या वसुली मोहिमेंतर्गत विशेष वसुली पथक निर्माण करून जास्तीतजास्त वसुली करण्यार्या अधिकार्यांच्या मदतीला ज्यादा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला आहे. सध्या करवसुली हा एकमेव कार्यक्रम राबविला जात आहे. शहरातील सर्वात मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून ती वर्तमानपत्र आणि शहराच्या चौकाचौकात प्रसिध्द केल्यामुळे शहरामध्ये थकबाकीदारामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. नगरपरिषदेकडून नॅशनल हेवी इंजीनियरीग कंपनी, मायमर कॉलेज, विविध कंपन्याचे मोबाईल टॉवर आदीवर जप्तीची कारवाई आणि त्यांचे नळजोड तोडणी कारवाई केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.