तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक पूजा, पालखी मिरवणूक, भजनी भारुड, लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत भेगडे यांचे हस्ते डोळसनाथ महाराजांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी सुशिल गाडे, शैलेश बेल्हेकर, सुमित लांजेकर, अनुराग बोत्रे, अमित भसे, अभिजित बोधे, मनोहर रायकर तसेच ग्रामपुरोहित अतुल रेडे व समस्त ग्रामस्थ आणि भाविक भक्तांची उपस्थिती होती.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
वार्षिक उत्सवानिमित्त मंदिरास फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे पासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. सायंकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात आली. पालखीपुढे भजन, ढोल, लेझीम पथके, बँड, तसेच फटक्याची आतषबाजी करून मिरवणूक पूर्ण झाली. मंदिरासमोर भैरवनाथ प्रासादीक भजनी भारुडाचा कार्यक्रम, तर घोरावाडी रेल्वे स्थानका जवळ मालती इनामदार नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांसह येथे भव्य कुस्त्यांची दंगलही आयोजित करण्यात आलेली असून मोठी बक्षीसे जाहीर करण्यात आलेली असून त्यात राज्यभरातील मल्ल सहभाग नोंदवणार आहेत.