पिंपरी-चिंचवड : तळेगाव येथील रहिवासी असलेल्या एका 16 वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली. ओमकार दशरथ ओडाफे (वय 16, रा. तळेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ओमकार याने निगडी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला होता. दुर्दैवाने महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी त्याचा अपघाती मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ओमकार हा महाविद्यालयातून घरी परतत असताना त्याने कानात मोबाईल हेडफोन घातले होते. अशा स्थितीत रेल्वेरूळ ओलांडत होता. त्याचवेळी एक्स्प्रेसने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
महाविद्यालयाचा पहिलाच दिवस
महाविद्यालयाचे दिवस हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य असते, असे म्हटले जाते. परंतु, कधी-कधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अतिउत्साह जीवघेणा ठरतो. असेच काहीसे ओमकारच्या बाबतीत घडले आहे. ओमकार याचा शुक्रवारी महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी त्याने काही मित्रांशी ओळखी केल्या. त्या ओळखी मनात साठवून तो नव्या स्वप्नांसह घरी परतण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानकावर येत होता. त्याने कानात हेडफोन घालून दादर्याचा वापर न करता सरळ रूळ ओलांडणे पसंत केले. याच आत्मविश्वासाने त्याचा घात केला. पुण्याकडे जाणार्या एक्स्प्रेसने त्याला जोरात धडक दिली. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
ओळखपत्रावरून पटली ओळख
ओमकारचे आई-वडील तळेगाव येथे माळीकाम करतात. या दुर्घटनेनंतर त्याच्याजवळ असलेल्या महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. त्यानंतर चिंचवड रेल्वे पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. तरुणांनी धोकादायकपणे रेल्वेरूळ ओलांडणे, चालत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.