तळेगाव दाभाडे : येथील तळेगाव स्टेशन चौकात कर्णकर्कश आवाजात डीजे (डॉल्बी सिस्टीम) वाजविणार्या दोघांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कारवाई केली. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ही डॉल्बी सिस्टीम बसविण्यात आली होती. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याने ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय रामभाऊ तेलंग (रा. कान्हेवाडी, ता. खेड) व सौरभ देवराम सावंत (रा. गोडूंब्रे, ता. मावळ) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणेला जात होती मिरवणूक
तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात संजय तेलंग व सौरभ सावंत हे त्यांची डॉल्बी साऊंड सिस्टीम कर्णकर्कश आवाजात वाजवत होते. ही डॉल्बी सिस्टीम धामणे गावाच्या हद्दीत गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत वाजविण्यासाठी जात होती. परंतु, मंडळाच्या मिरवणुकीत पोहोचण्याआधीच तळेगाव स्टेशन चौकात त्यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार दत्तात्रय हत्ते, विजय मारणे, प्रकाश वाघमारे, युवराज वाघमारे यांनी केली.
आवाज 55 डेसिबल्सपेक्षा जास्त नको
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 55 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजविण्यास बंदी आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात सर्वत्र करडी नजर ठेऊन ही कारवाई करण्यात आली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यावर्षी दहीहंडी उत्सवात डॉल्बी साऊंड सिस्टीम्स वाजवणार्या मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. यावर्षी गणेशोत्सवात डॉल्बी साऊंड सिस्टीम्स वाजवलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा धसका डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम्स चालकांनी घेतला आहे.