तळेगावात तलावाशेजारील जागा उद्यानाला

0

तळेगाव दाभाडे : पंचवटी कॉलनीच्या ओपनस्पेस पैकी जलतरण तलावालगत असलेली उर्वरित मोकळी जागा स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार उद्यानाकरिता उपयोगात आणावी. सदर उद्यान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असावे व ते सार्वजनिक असावे, असे निवेदन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे नगरसेवक चंद्रभान खळदे व नीलेश मेहता यांनी दिले.

यांनी केला पाठपुरावा
निवेदनात नमूद आहे की, यासंदर्भात नगरपरिषदेशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. या जागेसंदर्भात सुनावणीसाठी बोलविले गेले व या सुनावणीचा निकाल म्हणून 18 एप्रिलला तसा लेखी आदेश मुख्याधिकार्‍यांनी संबंधित संस्थेला दिला. ही जागा नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी दिनांक 1 मे 2017 या मुदतीपर्यंत खुली करण्यात यावी व 1 मे 2017 नंतर संबंधित जागा सार्वजनिक वापरासाठी खुली राहील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशानुसार अंदाजे एक एकर जागा पंचवटी कॉलनी व कडोलकर कॉलनीच्या मध्यभागी असल्याने येथे नागरिकांच्या मागणीनुसार प्रशस्त उद्यान होण्याचा मार्ग खुला झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीचा नागरिकांच्या वतीने पाठपुरावा नगरसेवक चंद्रभान खळदे व नीलेश मेहता यांनी केला होता.