बुधवारपासून मिळणार विचारांची मेजवानी
तळेगाव : मावळ विचार मंचच्यावतीने श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे यंदाही दि.10 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ विचार मंचच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवामध्ये व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जात असल्याचे, मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव (अप्पा) म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल राऊत यांनी यावर्षीच्या व्याख्यानमालेची माहिती दिली. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सन्माननीय वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत. 10 रोजी जीवनातील संस्कार केंद्र या विषयावर नागेश्वरी झाडे, 11 रोजी ‘असा घडतो उद्योजक’ यावर उद्योजक डॉ.रामदास माने, 12 रोजी स्वातंत्र्याची संग्राम युद्धे यावर लेखक विश्वास पाटील, 13 रोजी ‘महाराष्ट्राची काव्यधारा’ या विषयावर कवी नारायण पुरी, भरत दौंडकर व अनिल दीक्षित, 14 रोजी ‘देशांतर्गत सुरक्षा’ यावर निवृत ब्रिगेडियर हेमंत महाजन, 15 रोजी ‘माझा अभिनयाचा प्रवास’ यावर अभिनेते अनंत जोग, 16 रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यावर अभिनेते योगेश सोमण, 17 रोजी प्रा.संजय कळमकर यांचे ‘कथाकथन’ आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनुक्रमे लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका बिंद्रा गणात्रा, राज्य खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मावळचे तहसीलदार रणजित देसाई , धर्मदाय आयुक्त सचिव महेश सरनोबत, माजी आमदार बापूसाहेब पठारे, दिग्दर्शक किशोर बेळेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे हे असतील. 18 ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता वाजता विजयादशमीनिमित्त भारत मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.