तळेगाव दाभाडे : एमआयडीसीच्या विकासकामासाठी संपादित झालेली जमीन मोजताना स्थानिक नागरिकाने भूमापकावर दगडफेक केली. ही घटना मावळ तालुक्यातील बधालेवाडी येथे मंगळवारी (दि. 20) दुपारी चारच्या सुमारास घडली. भूमापक महेश दत्ताराम डोंगरे (रा. एरोली, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवराम बाबुशा जाधव (रा. बधालेवाडी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश हे भूमापक आहेत. मावळ तालुक्यातील बधालेवाडी येथे एमआयडीसीची विकासकामे होणार आहे. एमआयडीसीच्या विकासकामासाठी टप्पा क्रमांक दोनसाठी बधालेवाडी येथील जमीन संपादित झाली आहे. त्यासाठी महेश जुसी कंपनीच्या प्रतिनिधींसह जमीन मोजण्यासाठी आले होते. जमीन मोजून त्यानुसार सीमांकन करीत असताना आरोपी शिवराम याने महेश आणि त्यांच्या सहकार्यांवर दगडफेक केली. यामध्ये महेश जखमी झाले. त्यानुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.