नवलाख उंब्रे ग्रामपंचायतची एमआयडीसी प्रशासनाकडे मागणी
तळेगाव । तळेगाव एमआयडीसी असे नाव असलेली एमआयडीसी नवलाख उंब्रे, बधलवाडी आणि मिंडेवाडी या तीन गावांच्या परिसरात विस्तारली आहे. त्यामुळे या एमआयडीसीला ‘नवलाख उंब्रे एमआयडीसी’ असे नाव द्यावे, अशी मागणी नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याची विनंती केली आहे.
विविध मागण्या
नवलाख उंब्रे, बधलवाडी आणि मिंडेवाडी या तीन गावांना प्रत्येकी पंधरा एकर अशी एकूण 45 एकर जमीन गायरानासाठी देण्यात यावी. तसेच औद्योगिक महामंडळाने एमआयडीसीमध्ये शेती गेलेल्या शेतकर्रांना अद्याप मोबदला दिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकर्याला रस्त्याच्या लगतची जमीन द्यावी. ज्या शेतकर्यांवर तक्रार नाही; अशांना तात्काळ मोबदला द्यावा, ज्या शेतकर्रांची जमीन एमआयडीसीमध्ये गेलेली नाही; अशा जमिनीला जाण्यासाठी रस्ते करून द्यावेत, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत.
…तोवर ताबा सोडणार नाही
मिंडेवाडी येथील आदिवासी वस्तीचे पुनर्वसन मिंडेवाडी ठाकरवस्ती शेजारी करावे. तिन्ही गावांच्या सांडपाणी व कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. बधलवाडी येथे आरोग्य केंद्रासाठी अडीच एकर तर पंप हाऊस व टाकीसाठी पाच गुंठे जागा पहिल्याच टप्प्यात मिळावी, अशीदेखील शेतकर्रांनी मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचा एमआयडीसीमधील कंपनीमध्ये कामासाठी प्रामुख्याने विचार करावा. एमआयडीसी टप्पा क्रमांक एकमधील प्रकल्पग्रस्त शेतकर्रांच्या जमिनी घेऊन वर्ष लोटले. परंतु, अद्याप शेतकर्रांना परतावा मिळालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत झाडे, विहिरी व बांधासहित भूमी अधिग्रहणाचे पैसे सर्व शेतकर्रांना मिळत नाहीत; तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनीचा ताबा सोडणार नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.