तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यासाठी 1799 कोटींचा निधी

0

चाकण । शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षांपासून बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या खेड तालुक्यातील महत्त्वाच्या तीन रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. महत्वाच्या 3 रस्त्यांसाठी केंद्र शासनाकडून 3615 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

तळेगाव, चाकण, रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे. आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी सदर रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून रस्त्याचा विषय अनेक प्रकारे अधिवेशनात मांडून त्याचा सतत पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने केंद्राकडे याबाबतचा पाठपुरावा शासन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आमदार सुरेश गोरे यांनी 2016 च्या हिवाळी अधिवेशनात दिली होती. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने रस्त्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदर रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच प्रकल्प अहवाल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यासाठी 15,139 कोटी मंजूर केले आहेत. त्यापैकी खेड तालुक्यासाठी 3615 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

असा होणार खर्च
तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा-चौफुला राष्ट्रीय महामार्गासाठी 1799 कोटी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग नाशिक फाटा येथून सहा पदरी करण्यासाठी 950 कोटी, धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणारा सरलगाव-भीमाशंकर-वाडा-खेड रस्त्यासाठी 966 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.