तळेगाव दाभाडेत अतिक्रमण निर्मूलनाला गती

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन विभागातील चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाढते अतिक्रमण ही सतत होणार्‍या वाहतूक कोंडीचे एक कारण आहे. उशिरा का होईना पण पोलिसांना जाग आली आणि तळेगाव जनरल रुग्णालयाजवळ रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या पथारीवाल्यांवर तळेगाव पोलिसांनी कारवाई केली. पोलिस निरीक्षक मुकुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे व सहकार्‍यांनी पथारीवाल्यांना हटविले. काही पथारीवाल्यांवर खटले दाखल केले. काहींवर दंडात्मक कारवाई केली. तर काही पथारीवाल्यांना कडक समज दिली.

प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ
या कारवाईमुळे रस्ता चांगलाच मोकळा झाला आहे. मोकळ्या रस्त्याचा वापर पादचारी मार्गासाठी करावा अशी ज्येष्ठांसह सर्व नागरिकांनी केली आहे. तसेच रस्त्यावरील सर्वच अतिक्रमणे (टपर्‍या, दुकाने, दुकानांपुढील पार्किंग व सर्व प्रकारच्या रिक्षा व वाहने) हटवावीत. ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबवू नये, कोणत्याही दबावाला बळी पडू नये. हीच लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, वाहतूक प्रकल्पाच्या आड येथील अतिक्रमण येत होते. हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पोलिस दलातर्फे तळेगाव नगरपरिषदेला नुकतेच सोपविण्यात आले होते.