तळेगाव दाभाडे : यंदाच्या गणेशोत्सवात डी.जे. आणि डॉल्बी सिस्टीमला बंद घालण्यात आली आहे. त्यामुळे ढोल, ताशा अशा पारंपरिक वाद्यांना महत्त्व येणार असून, त्यांची मागणी वाढणार आहे. पारंपरिक वाद्यांसह मर्दानी खेळ व प्रात्यक्षिके सादर करणार्यांना सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठी मागणी असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध ढोल, ताशा पथके व मर्दानी खेळ-प्रात्यक्षिके सादर करणार्या पथकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील विविध सार्वजनिक मंडळांकडून ढोल-ताशा वादनाचा दररोज जोरदार सराव सुरू करण्यात आला आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर
तळेगाव दाभाडे शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. लोकमान्य टिळकांनी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आहे. ढोल-ताशा व लेझिम खेळाकरिता तळेगाव शहर हे सुरुवातीपासूनच सर्वत्र प्रसिद्ध आहे. न्यायालयाने डी.जे. आणि डॉल्बीच्या आवाजावर कायदेशीर बंधने घातल्यामुळे पारंपरिक वाद्ये आणि खेळांना महत्त्व आले आहे. त्यामुळे ढोल-ताशा वादनाचा सराव स्वत:हून सार्वजनिक मंडळांनी सुरू केलेला आहे. दररोज सायंकाळी मोकळ्या जागेत जाऊन मंडळाचे ढोल आणि ताशे वादक सराव करीत आहेत.