तिघा आरोपींना पोलिसांनी केली अटक
तळेगाव :भारतीय बनावटीच्या दारूची वाहतूक करणार्या दोन वाहनांची झडती घेत 23 लाख 37 हजार 840 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. निघोजे एमआयडीसी हद्दीतील तळवडे-म्हाळुंगे रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव पथकाने ही कारवाई केली. कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. भुवन गोविंदवल्लभ बलसुनी (वय 37, रा. ताम्हाने वस्ती, चिखली), महादेव हरिदास गायकवाड (वय 33, रा. वारजे माळवाडी), चेतन चंद्रकांत गायकवाड (वय 23, रा. 258 गायकवाड वाडी, बहुली गावठाण, बहुली, ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सापळा रचून केली तपासणी
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी दोन वाहने निघोजे एमआयडीसी हद्दीतील तळवडे-म्हाळुंगे रोडवरून जाणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून येणार्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी करताना इनोव्हा कार (एम एच 12 / के एन 4000) आणि बोलेरो पिकअप (एम एच 12 / एन एक्स 1827) या दोन वाहनांमधून भारतीय बनावटीच्या दारूचे 30 बॉक्स आढळले. यावरून दोन्ही गाड्यांमधील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मुळशी तालुक्यातील डावजे येथे 117 मद्याचे बॉक्स ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार डावजे येथून दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. दोन कारवायांमध्ये एकूण 23 लाख 37 हजार 840 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
विभागीय उपायुक्तांच्या पथकाची कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक बी. एच. तडवी, उपअधीक्षक एस. जे. पाटील, प्रविण तांबे, सुनिल फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक आर. एल. खोत, उपनिरीक्षक एन. एन. होलमुखे, आर. ए. दिवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अशोक राऊत, स्वाती भरणे-शिंगाडे, ए. व्ही. भताने, बी. एस. रणसुरे, बी. एस. राठोड यांच्या पथकाने केली.