तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण

0

तळेगाव-दाभाडे : महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपण महोत्सवात तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेला दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य दिले होते. हे उद्दिष्ट्य नगरपरिषदेने एका महिन्यातच पूर्ण केले असून, या वर्षात नगरपरिषद येथून पुढेही 10 हजारांपर्यंत वृक्ष लावणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांना सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने वृक्षारोपण मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

योग्य नियोजनामुळेच झाले शक्य
कमीत कमी दोन हजार वृक्षांची लागवड करावी, असे उद्दिष्ट्य राज्य शासनाने नगरपरिषदांना दिले होते. मात्र, तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेने उद्यान विभागामार्फत 10 हजार वृक्षांची लागवड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य निश्‍चित केले आहे. नगरपरिषदेच्या उद्यान विभागाचे प्रमुख विशाल मिंड यांनी लागवडीसाठीची रोपे तसेच त्यासाठीचे खड्डे, लागवडी करिता लागणारे मजूर यांचे नियोजन योग्य प्रकारे केल्याने एकाच महिन्यात दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले, असेही आवारे यांनी सांगितले.

मोहिमेला सर्वांचे सहकार्य
या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनापासून करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, गणेश मंडळे, सहकारी संस्था, बँक, पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम वेगाने राबविण्यात आली. यावर्षीच्या वृक्षलागवडीसाठी 12 हजार रोपांची निविदा तसेच 10 हजार लोखंडी पिजर्‍यांची निविदा मंजूर झालेल्या आहेत. याशिवाय वृक्षलागवडीसाठी लागणारे खड्डे जेसीबीने खणण्यात येत असून, त्याचीही निविदा मंजूर करण्यात आलेली आहे. शहरात 10 हजार रोपे तयार असल्याची माहिती मिळाली.