तळेगाव दाभाडे येथे नियोजनाअभावी पाणीटंचाई

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी सोमाटणे फाट्याजवळ फुटल्याने गाव विभागातील नागरिकांना दोन दिवस पाणी उलपब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नागरीकामध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी असूनही पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. तळेगाव शहराला पवना व इंद्रायाणी नदीवरून रोज शहरासाठी दोन कोटी वीस लाख लीटर पाणी उपलब्ध आहे. नगरपरिषदेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले असले तरी हे दुरुस्तीचे काम अतिशय मंद गतीने चालल्या मुळे नागरिकांना मात्र पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे.

दोन स्वतंत्र पाणी योजना तरीही…
पवना नदीवरून आणि इंद्रायणी नदीवरून दोन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहेत त्यातील पवना नदीवरून 20 इंची व 12 इंची जलवाहिनीतून पाणी आणले जाते त्यातील 20 इंची जलवाहिनी सोमाटणे गावाजवळील द्रुतगती मार्गावर फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाला व नागरिकांना बुधवार व गुरुवार असे दोन दिवस पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागले आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारे पवना व इंद्रायणी नदीवरील पंप, पंपहाऊस, दोन्ही भागातील फिल्टर प्लँट, मुख्य जलवाहिन्या, साठवण टाक्या, वितरण जलवाहिन्या यांची दुरवस्था अणि बेकायदेशीरपणे शहर व शहराच्या हद्दीबाहेर दिलेली नळ कनेक्शन आदी अडचणीमुळे नागरिक पाणी प्रश्नांवरून त्रस्त आहेतच. त्यात जलवाहिनी फुटल्याने आणखी भर पडल्याने नागरिकांचा संताप अनावर होत आहे.