तळेगाव नागरिकांनी काढला धडक मोर्चा

0

तळेगाव दाभाडे। तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजने विषयीच्या प्रमुख मागण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने नगरपरिषदेवर नागरिकांनी धडक मोर्चा काढला होता. हा मोर्चा ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला या मोर्चात तळेगाव शहर विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, विशाल दाभाडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगला भेगडे यांच्यासह निळकंठ नगर, संभाजी नगर, 6523, सिद्धार्थनगर इत्यादी भागातील नागरीक सहभागी झाले होते. हा मोर्चा मारुती मंदिर चौकातून निघून नगरपरिषदेवर नेण्यात आला.

या आहेत मागण्या
मोर्चाच्या वतीने नगरपरिषदेचे शहर अभियंता अनिल अनगळ यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थींना विश्वासात घ्यावे, योजनेविषयीची सविस्तर माहिती द्यावी, योजनेतील गैरसमज दूर करावे, या योजनेचा विकास आराखडा तयार करावा, ज्या भागातील झोपडपट्टी धारक विस्तापित झाले आहेत त्यांचे मोफत पुनर्वसन करावे, स.नं 6523 मधील रणजीतसिंह दाभाडे कॉलनीवर निवासी क्षेत्राचा आरक्षणाचा ठराव पारित करावा, बहुमजली इमारत बांधल्यावर लिफ्ट व इमारतीचा मेटेनन्सचा खर्च नगरपरिषदेने करावा, दिव्यांग (अपंग) व्यक्तींना या योजनेत विशेष आरक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्याचा समावेश आहे. नगरपरिषद कार्यालयावर सभा होऊन मागण्याचे निवेदन सादर केले.