तळेगाव : तळेगावचा मनोरंजक, रोमहर्षक इतिहास जगापुढे ठेवण्यासाठी तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रंथनिर्मितीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तळेगावच्या ऐतिहासिक दाभाडे राजघराण्यातील माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे तसेच उमाराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, ग्रंथनिर्मिती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, समितीचे उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, मुख्य संपादक सुरेश साखवळकर, कार्यकारी संपादक प्रा. जयंत जोर्वेकर, सचिव वसंतराव भेगडे आदी उपस्थित होते.
तळेगावचा इतिहास रोमहर्षक आणि प्रेरणादायी
यावेळी ‘तळेगावचा इतिहास’ या विषयावर इतिहासाचे अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान झाले. प्रास्ताविक करताना सुरेश साखवळकर म्हणाले की, समग्र तळेगावचा इतिहास हा संकल्प कृष्णराव भेगडे यांच्या मनात येणे हा दैवी संकेत म्हणावा लागेल, तळेगावचा इतिहास रोमहर्षक व प्रेरणादायी आहे, त्यामुळे या ग्रंथासाठी 10 विषय समित्या नेमल्या असून तळेगावचे सर्व क्षेत्रातील महात्म्य या ग्रंथाच्या माध्यमातून जगापुढे येईल, असेही त्यांनी सांगितले.
नव्या पिढीसाठी ग्रंथ उपयुक्त
तळेगावचा मनोरंजक, रोमहर्षक इतिहास जगापुढे ठेवण्यासाठी हा ग्रंथनिर्मिती प्रकल्प. दाभाडे घराण्याचा कार्यकाल, स्वातंत्र्यपूर्व कालखंड व नंतरचा कालखंड याचा आढावा आम्ही घेत आहोत. तळेगाव काल, आज, उद्या असे ग्रंथाचे स्वरूप राहील. तसेच गावातील विविध क्षेत्रातील संस्था, व्यक्तींचे योगदान याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. तसेच नव्या पिढीचे जीवन घडविण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. पहिले तीन महिने माहिती संकलन, एक वर्षात ग्रंथ प्रकाशन केले जाणार असून सर्वांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारणार आहे. प्रत्येक घरात हा ग्रंथ संग्रही राहिला पाहिजे. नव्या विकसित तळेगावच्या दृष्टीने व्हीजन या ग्रंथाच्या निमित्ताने शब्दबद्ध होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
खंडेराव दाभाडे यांना सरसेनापतिपद मिळून 300 वर्षे पूर्ण झाली. त्याच वर्षी ही ग्रंथनिर्मिती होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी या ग्रंथनिर्मितीत योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी केले. पुढच्या पाडव्यापर्यंत ग्रंथ प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील, असे साखवळकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात प्रमाणभूत ग्रंथ ठरेल. इतर शहरे या ग्रंथापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयंत जोर्वेकर यांनी केले. तर वसंत भेगडे यांनी आभार मानले.