खिडकीचे गज कापून केला घरात प्रवेश
तळेगाव दाभाडे : पुतणीच्या साखरपुड्यासाठी गेलेले तळेगाव भाजपचे शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.8 रोजी) 4 लाखांची चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 4 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यासंदर्भात संतोष दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुतणीचा साखरपुड्यासाठी दाभाडे परिवार सायंकाळी सव्वा सहा वाजता वडगाव येथील ओरीएन्टल हॉटेल येथे घराला कुलूप लाऊन गेले होते. तोच डाव चोरांनी साधला व बेडरूममधील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यावर त्या ठिकाणचे साहित्य घरी ठेवण्यासाठी दाभाडे यांचा ड्रायव्हर रात्री 10 च्या दरम्यान घरी आला. त्यावेळी त्याला घरातील मुख्य दरवाजाला आतून कडी लावल्याचे आढळले. त्याने लगेच दाभाडे यांना फोनकरून आतून दरवाजा बंद असल्याचे सांगितले. घरातील सीसी टीव्हीचे कॅमेरे चेक करण्यास सांगितले. दाभाडे यांनी सीसीटीव्हीचे कॅमेरे मोबाईल वरून तपासले असता ते कार्यरत नसल्याचे त्यांना आढळून आले.
गज कापल्याचे आढळले
त्यानंतर संतोष दाभाडे आपल्या कुटुंबासह घरी आले. मुख्य दरवाजा उघडून आत गेले असता त्यांना सीसीटीव्ही कॅमेरेचे रेकार्डिंगचे कार्ड व व्हाय-फायचे पोर्टल नसल्याचे आढळले. तसेच बेडरूममधील खिडकीचे गज कापल्याचे आढळले. लाकडी कपाट तोडून रक्कम व दागिने चोरीला गेल्याचे दिसले. चोरांनी घरातील 2 लाख 66 हजार रुपयांचे दागिने व 1 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे करीत आहे.