जळगाव । तळेले कॉलनीतील महिलांनी त्यांच्या कॉलनीत पक्क्या गटारी नसल्याने होणारी अडचण सोडविण्यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या माजी महानगराध्यक्ष प्रतिभा शिरसाठ यांच्या नेतृत्वात भेट घेतली. जुना खेडी रस्त्यावरील तळले कॉलनीत पक्क्या गटारी नसल्याने घरांतील सांडपाणी रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे. सांडपाणी रस्त्यांवर सोडल्याने दुर्गंधी पसरून सगळीकडे घाण साचली आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर चालणे देखील अडचणीचे ठरत असल्याची तक्रार या महिलांनी महापौरांना केली. लवकरात लवकर पक्क्या गटारी बाधूंन न दिल्यास मुलांसह महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.
जुना खेडी परिसरात सांडपाणी निचरावरुन वाद
सांडपाण्याचे डबके रस्त्यांवरच साचल्याने बरेच रहिवाशी व नागरिक पडून जखमी होत आहेत. पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात विषारी जनवरांची व डासांची भिती असते. याबाबत त्यांनी वारंवार महापालिकेसमोर कैफयत मांडत आले आहेत. त्यांना पक्क्या गटारी बांधून मिळवी अशी विनंती केली. गेल्या 20 वर्षांपासून सांडपाणी सोडण्यावरून आपसात भांडणे होत आहेत. शेजार्या शेजार्यांमध्ये वैर निर्माण झाले आहे. सततच्या भांडणाला त्रासले असून आम्हाला पक्क्या गटारी बांधून द्या अशी विनंती या महिला करीत होत्या. कॉलनीत कच्च्या गटारी असून यावर काही नागरींकाद्वारे भर करून बंद करण्यात आले आहे. बेकायदशीर पणे भराव करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी या महिलांनी केली. तसेच महापौरांनी त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी कॉलनीत येऊन प्रत्यक्ष पहाणी करावी असा आग्रह महिलांनी महापौर लढ्ढा यांना केली. दरम्यान, महापौर लढ्ढा यांनी महिलांना शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, शहर अभियंता सुनील भोळे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रतिभा शिरसाठ, योगिता पाटील, जयश्री खडके, प्रतिभा महाजन, निलीमा बोरोले, निता रोटे, ममता कोल्हे, अनिता जाधव, आशा पाटील, सुनीता सुर्यवंशी, कुमुदिनी भावसार, धनश्री चौधरी, कृष्णा चव्हाण, सविता चव्हाण, पिंकी चव्हाण, प्रीती सोलंकी शालिनी लोखंडे, देवकाबाई बारी, कल्पना भंगाळे आदी महिलांच्या सह्या आहेत.