तळेगावात जोरदार पावसाची हजेरी

0
तळेगाव दाभाडे : अचानकपणे आलेल्या वळवाच्या जोरदार पावसाने तळेगाव दाभाडे शहर आणि पंचक्रोशिला झोडपून काढले. या पावसाचा फायदा खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांच्या पेरण्यांकरिता होणार असल्याने शेतकरी वर्गाकडून या पावसाचे स्वागत होत आहे. बुधवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक पावसाचे ढग जमा होऊन 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. सुमारे एक तास भर शहर परिसर आणि पंचक्रोशित जोरदार पाऊस कोसळत होता. जोरदार पावसाबरोबर विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटहि अधून-मधून होत होता जोरदार पणे पडत असलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले.
यावर्षी मान्सूनच्या पावसाने परतीच्या टप्प्यात चांगलाच ताण दिला आहे. त्यामुळे अखेर टप्प्यातील भात पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आले असताना पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. यावेळी अचानकपणे आलेल्या जोरदार पावसाने खरीप भात पिकाबरोबर रब्बीच्या ज्वारी, गहू, हरबरा, करडई या पिकांच्या पेरण्या पूर्व मशागती आणि पेरणीसाठी चांगला उपयोग होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. यावर्षी वेळोवेळी मान्सूनच्या पावसाने खरीप भात पिकांच्या वाढीच्या वेळी चांगला हात दिलेला असून यंदाचे खरीप भात पीक चांगले आलेले आहे. तर अचानक पणे आलेल्या वळवाच्या जोरदार पावसाने आगामी काळासाठी फायदा होणार आहे