तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण

0

राज्यातील रासायनिक कंपन्या या नागरिक, प्राणी, पक्ष्यांना व सजीवसृष्टीच्या मृत्यूला आमंत्रण ठरणार असे वाटू लागले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाने ठाण्यातील व इतर काही राज्यांतील रासायनिक कंपन्यांच्या होणार्‍या प्रदूषणाबाबत गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली. तरीही रासायनिक कंपन्यांचे मालक बेशिस्तीने वागत असल्याचे दिसत आहे. आपल्यामुळे आपण परिसरातील जीवसृष्टीला मृत्यूच्या खाईत लोटत आहे, याची त्यांना जाणीव होत नाही, ही खेदजनक बाब आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांतून उत्सर्जित झालेल्या वायू व रसायनांमुळे डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याची घटना घडली होती. त्यानंतरही प्रदूषण नियंत्रक मंडळाने सदर रासायनिक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही, हे विशेष होय. आत्ताही पनवेलजवळील तळोजा येथील एमआडीसी परिसरातील रासायनिक कंपन्यांतून उत्सर्जित होणार्‍या घातक वायू व रसायनांमुळे परिसरातील संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. तळोजा येथील रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे येथील प्राण्यांचा चक्क रंग बदलला असल्यामुळे याची दखल जागतिक पातळीवरील वृत्तपत्रांनी घेतली आहे. जागतिक पातळीवर या प्रदूषणाबाबत जागृत पत्रकारांनी चिंता व्यक्त केली आहे. पण याची खबरबात स्थानिक प्रदूषण नियंत्रक मंडळाला व प्रशासनाला नाही, हे अजबच म्हटले पाहिजे. तळोजा एमआयडीसी परिसरात सुमारे 330 रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांतून सातत्याने वायू व रसायनांचे उत्सर्जन होत असते. हा रासायनिक कचरा कुठे टाकला जातो, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासण्याची गरज आहे. कारण या परिसरातील कासाडी नदीला या कंपन्यांचे ग्रहण लागले आहे. कासाडी नदीत रासायनिक कंपन्यांची प्रदूषके सोडली जातात, त्यामुळे या नदीचा नाला बनला आहे. नदीच्या पात्रातील मासे व इतर जलचरांनी केव्हाच आपले प्राण सोडले आहेत. आज पाण्याचे मोठे दुर्भिक्ष महाराष्ट्रासह देशाला सतावत असताना नैसर्गिक स्त्रोत कायमचा बंद करणाऱया स्वार्थी प्रवृत्तीच्या रासायनिक कंपनींच्या मालकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. कारण केंद्र व राज्य सरकार पाणी बचाव मोहिमेवर खूप खर्च करत आहे, परंतु देशातील नागरिकांना पुरेसे पाणी प्यायला मिळत नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीत रासायनिक कंपन्यांमधून कपड्यांना डाय करण्यासाठी जो रंग बनवला जातो, त्या रंगातील रासायनिक घटक कंपनीतून थेट वातावरणात सोडल्यामुळे कुत्र्यांचे रंग बदलले असल्याचे दिसून आले आहे. शरीराला रंग लागल्यामुळे श्वान रंग चाटतात. त्याद्वारे रासायनिक पुड श्वानांच्या तोंडावाटे शरिरात जात आहे. यामुळे श्‍वानांना श्‍वसनाचे रोग, पोटातील रोग व त्वचा रोग होऊन कर्करोग, किडनीचे आजार जडले आहेत. रासायनिक कंपन्यांच्या घातक कचर्‍यामुळे प्राण्यांचे रंग बदलण्याची घटना भीतिदायक आहे. कारण प्राण्यांनंतर परिसरातील मानवावर, वृक्षांवर, पिकांवर परिणाम होण्याचा धोका भवितव्यात दिसून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. केंद्र सरकारने याची दखल घेण्याची गरज आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांनी उघड्यावर प्रदूषके सोडल्यामुळे अनेकवेळा परिसरातील ग्रामस्थांनी रासायनिक कंपन्यांच्या बेशिस्त कारभारबाबत आंदोलने केली; परंतु त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी घेतली.

अशोक सुतार – 8600316798