तळोदा । तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील फिल्टर पाण्याचे मशीन मागील 3 महिन्यांपासून बंद असल्याने, ऐन उन्हाळयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून त्यांना इतर ठिकाणावरुन विकत पाणी घ्यावे लागत आहे आणि विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला देणार्या उपजिल्हा रुग्णालयातच, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे आणि तात्काळ फिल्टर दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तळोदयातील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य आदिवासी, गरीब नागरिक मोठ्या संख्यने उपचारासाठी गर्दी करीत असतात.
आरोग्याशी होतोय खेळ : शुद्ध पाणी प्या, पाणी उकळून प्या, असे सल्ले देणारे उपजिल्हा रुग्णालय सध्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. ऐन उन्हाळ्यात फिल्टर बंद असल्याने रुग्णांना नाईलाजास्तव माठातील अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांचा आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचे जाणवत आहे आणि यामुळे रुग्णांचा नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रुग्णांना आर्थिक भूर्दंड : तळोद्यातील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील दुर्गम, अती दुर्गम भागातील रुग्ण उपचारांसाठी नेहमीच येत असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बेताची असते. रुग्णालयात अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांना चोवीस तास वीज, शुद्ध पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. ऐन उन्हाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे आणि हॉटेल्स किंवा इतरत्र जावून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकप्रकारे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सध्या मे महिन्यात सर्वत्र उन्हाचा पारा चढला असून, अशा वातावरणात प्रत्येकाची लाही लाही होत आहे. यातच उपजिल्हा रुग्णालयातील फिल्टर पाण्याचे मशीन मागील 3 महिन्यापासून बंद असल्याने, रुग्ण व त्यांचा नातेवाईकांची पिण्याचा पाण्यासाठी गैरसोय होत आहे आणि ऐन उन्हाळ्यात पिण्याचा पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. तसेच रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी देणे गरजेचे असल्यामुळे त्यांना हॉटेल्स किंवा इतर ठिकानांवरून स्वतःचे पैसे खर्चून विकत पाणी आणावे लागतेय उपजिल्हा रुग्णालयात पर्यायी व्यवस्था म्हणून माठाची सुविधा पुरविण्यात आली आहे. परंतु रुग्णालयात दररोज जवळपास 130 ते 140 रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. त्यामुळे माठातील पाणी किती रुग्णांना व त्यांचा नातेवाईकांना मिळत असेल हा संशोधनाचा प्रश्न आहे. कर्मचारी पाण्याचा माठ भरण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.