पुणे येथील मित्र केंद्र आणि लोकसहभागातून मदत; झेडपी उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्याहस्ते उद्घाटन
तळोदा । सध्याचे युग हे डिजीटल युग असून सर्व क्षेत्रात डिजीटल क्रांती झाली आहे. शालेर विद्यार्थी देखील डिजीटल संकल्पनेपासून वंचीत राहू नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत डिजीटल संकल्पना पोहोचविण्यासाठी शासनातर्फे डिजीटल अभ्यासक्रमावर भर देण्यात आलेला आहे. शासनाकडून प्रत्येक शाळांना डिजीटल क्रांतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. दरम्यान तळोदा येथील जिल्हा परिषद शाळा नं.7 च्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती दिपक मोरे, पुणे येथील युवक मित्र केंद्रचे प्रवीण महाजन, केंद्रप्रमुख अलका जयस्वाल, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता बोरदे, बुधावलचे सरपंच मंगलसिंग पाडवी आदी उपस्थित होते. डिजीटल क्लासरुम तयार झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आदिवासी भागातील शाळा आदर्श करण्याचा प्रयत्न
लोकसहभागातुन वर्गणी
आदिवासी भागात पेसा निधीच्या माध्यमातून शाळा डिजिटल होत आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी पेसाच्या निधी न वापरता सामाजिक संस्थाच्या पुढाकाराने शाळा डिजिटल करून एक आदर्श रुजविला जात आहे. तळोदा शहरातील जि.प. शाळा क्रमांक 7 या शाळेच्या देखील समावेश झाला असून पेसाचा निधी न वापरता पुणे येथील युवक मित्र परिवाराचे प्रवीण महाजन व सहकारी मित्रांच्या सहाय्याने लोकवर्गणी व तज्ञ मार्गदर्शक मिळवून दिले.
पुणे केंद्राचे आभार
क्लासरूम डिजिटल करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाला मदत केली आहे. झेडपी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. तर आपल्या मनोगतात प्रवीण महाजन व सहकार्यांचे कौतुक केले. सातपुडा भागातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांची डिजीटलकडे वाटचाल सुरू आहे.
विद्यार्थी कलागुणांना वाव
आदिवासी पाड्यातील शाळाना आदर्श कसे करता येईल याकडे शिक्षकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. डिजिटल युगाच्या स्पर्धेत आपली मुले टिकली पाहिजेत.त्याच्यात विविध कला गुणांची माहिती व्हावी, संगणकाच्या माध्यमातून विविध विषयाचे ज्ञान संकलन व्हावे त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक बापू पाडवी, पंकज कलाल, नवल माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवल कापुरे यांनी केले तर आभार अनिल मालपुरे यांनी मानले.