तळोदा । महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ’मागेल त्याला शेततळे’ या योजनेला तळोदे तालुक्यातुन अत्यल्प असा प्रतिसाद लाभला आहे. तालुक्यातील उपयुक्त व पुरेशी अशी असलेली पाण्याच्या स्थितीमुळेच शेतकर्यांची या योजनेविषयी असलेली अनास्था कारणीभूत ठरत आहे. तरी पण शेतकर्यांसाठी अश्या योजनांचे महत्त्व लक्षात घेता, कृषी विभागाकडून अजून जास्त प्रमाणात प्रयत्न करीत शेतकर्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले आहे.
75 लक्ष्यांक, प्रोत्साहनाचा पाझर आटल्याने 74 शेततळी कागदांवरच सुकली !
एकूण 74 शेतकर्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच मंजुरी देण्यात आलेल्या शेतकर्यांपैकी 3 ते 4 शेतकर्यांनी काम सुरु केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा त्यांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत संख्या लक्षात घेता या योजनेला तळोदे तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला असेच म्हणावे लागेल. सुरुवातीला असे वाटले होते की, शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेतील परंतु प्रत्यक्षात शेतकर्यांकडून या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण तळोदे तालुक्यात पाण्याची परिस्थिती बर्यापैकी आहे आणि अजून तरी इतर भागांतील पाण्याची बिकट परिस्थिती सारखी परिस्थिती आपल्याकडे नाही. तरी पण कृषी विभागांच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी, शेतकर्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी अजून जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरुन भविष्यात यांसारख्या चांगल्या योजनांना जास्त प्रमाणात शेतकर्यांचा प्रतिसाद लाभेल.
102 शेतकर्यांनी केले अर्ज
’मागेल त्याला शेततळे’ ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी व अभिनव अशी योजना आहे. या योजनेमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यांमध्ये भरले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचा शेतात संरक्षित मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. हे पाणी पावसाच्या खंड काळात देखील शेतकर्यांना उपयोगात येणार आहे. तळोदे तालुक्यासाठी ’मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी एकूण 75 लक्ष्यांक देण्यात आला होता. या योजनेचा लाभासाठी अद्याप पावेतो तालुक्यातून 102 शेतकर्यांनी ’आपले सरकार’ या वेबसाईट वर अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 28 शेतकर्यांचे अर्ज या योजनेचे निकष पूर्ण करीत असल्यामुळे त्यांना पात्र ठरविण्यात आले व त्यांना कामांची मंजुरी देण्यात आली आहे.
कृषी विभागाला प्राप्त झालेल्या अर्जांची तालुका स्तरीय समितीमार्फत छाननी करुन, पात्र शेतकर्यांना लागलीच कामांची मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेला आमच्या अपेक्षेपेक्षा थोडा कमी प्रतिसाद लाभला आहे, कारण इतर भागांचा तुलनेत आपल्या तालुक्यात पाण्याची स्थिती बर्यापैकी आहे. या योजनेची शेतकर्यांना माहिती व्हावी यांसाठी आम्ही आमच्या स्तरावर पूर्ण मेहनत घेत योग्य ती जनजागृती केली आहे. तसेच अजूनही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करुन, या योजनेचा लाभ घेवू शकतात.
– पी. व्ही. भोर, तालुका कृषी अधिकारी