तळोद्यात अल्पवयीन मुलगा जळीत अवस्थेत अढळला

0

तळोदा । तळोदा येथील सोळा वर्षीय शाळकरी अल्पवयीन युवक तळोदावळण रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ जळत असल्याची माहिती शहरात पसरल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात या घटनेबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीवरुन अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील तळोदा बायपास नजीक असलेल्या त्रिमूत्री हॉटेल जवळील एका पत्र्याच्या शेडजवळ एक 16 वर्षीय शाळकरी अल्पवयीन युवक जळीत अवस्थेत आढळला. यावेळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, पुष्पेंद्र दुबे, संदीप परदेशी, योगेश मराठे, योगेश पाडवी आदींनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यांनी जवळच असलेल्या एका घरातून चादर आणून त्यात त्याला लपेटले व तळोदा उपजिल्हा रुग्णालयात येथे रुग्णवाहिकेतून दाखल केले. तळोदा उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सदर घटना शहरात वार्‍यासारखी पसरली, सदर घटना मागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याबाबत शहरात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. यावेळी तातडीने पो. उपनिरीक्षक यादव भदाणे, युवराज चव्हाण, देविदास विसपुते, वाहन चालक सतिष ढोले यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना दुपारी 2 वाजे दरम्यान हरकलाल नगर येथील पेट्रोल पंप वरुन 40 रु चे पेट्रोल विकत घेतले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्यामुळे संबंधित युवकाने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.