तळोदा। तळोद्यातील आदिवासी भागातील विविध समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आदिवासी युवाशक्ती संघटना आणि शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेत आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही युवाशक्ती आणि शिवसेनेच्यावतीने मागण्यांसंबंधीचे निवेदन देण्यात आले. सर्व समस्यांचे वेळेत निराकरण केले नाही तर पालिकेला घेराव घालण्यात येईल आणि होणार्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान एकाच दिवशी, एकाच वेळी झालेल्या दोन आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची पुरती धावपळ उडाली.पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचा अनुपस्थितीत राजेंद्र सैंदाणे यांना दोन्ही आंदोलनाचा सामना करावा लागला.
आदिवासी विभागात सफाई नाहीच : आदिवासी युवाशक्ती संघटनेचा वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहराचा चारही बाजुला आदिवासी वस्ती असलेल्या बारली हट्टी, मरी माता परिसर, शबरी चौक, प्रधान हट्टी, रामगड, धानका वाडा, चांभारी हट्टी, टेंभारी हट्टी, बाग हट्टी आदी भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार सफाईसाठी कधीच येत नाही. यामुळे गोर गरिबांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आदिवासी युवाशक्तीचे अध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, सचिव योगेश पाडवी, अर्जुन पाडवी, अभय वळवी, चेतन शर्मा, शैलाबाई पाडवी, कोचरीबाई प्रधान, केसुबाई पाडवी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
शिवसेनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा पालिकेकडून मागील वर्षी जुना जकात नाका ते विद्यानगरी पर्यंत एक मोठी गटार बांधण्यात आली होती. सदर गटार ही बंदिस्त नसल्याने अनेक वेळा असंख्य नागरिक या गटारीत पडले आहेत तसेच गटारींमुळे तेथील नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊन त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.निवेदनावर सेनेचे तालुका प्रमुख अनुप उदासी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, सौ. कोमल सोनार, आनंद सोनार, संजय पटेल, प्रदीप शेंडे, काशिनाथ कोळी, देवा कलाल आदींचा स्वाक्षर्या आहेत.