तळोदा (किरण पाटील)। एप्रिल महिन्याच्या पहिलाच आठवड्या पासून उन्हाची तीव्रता वाढली असून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची पाऊले शितगृहाकडे वळू लागली आहे. ब्रँडेड कंपनीचे बाटली बंद शितपेया ऐवजी अवघ्या दहा रुपयांत तहान भागवणार्या ताजा ऊसाचा रस व साखरेचा पाक व निबु रस पासून तयार करण्यात आलेली सिकंजीला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. तळोदा बस स्टॉपपासून तर ठीक ठिकाणी रसवंती दुकान व सिकंजी लॉरी व्यवसायकांनी उभ्या केल्या आहेत त्यावर लोकांची गर्दी दिसून येत आहेत.
संध्याकाळी फिरणार्यांची गर्दी
तीव्र उन्हामुळे जीवाची लाही लाही कमी करण्यासाठी हमखास संध्याकाळी निघणारे परिवार ऊसाचा थंडगार व सिकंजी पिण्यासाठी प्रत्येक लॉरी वर गर्दी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मोठं मोठ्या जाहिरात लावून सजावट केलेल्या ब्रँडेड शीतपेय दुकाने व्यवसाय थंडावला असून गावरान पेयांकडे बालगोपाळासह आबालवृद्धांनी पसंती दिली आहे.
उन्हाळयातील रोजगार
दुपारचे 11 वाजले म्हणजे घराच्या बाहेर निघता येत नाही. त्यातच घरातील वडीलधारी मंडळी प्रकृती सांभाळा असे सल्ला देत असतात. उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी घरातील उपायसुद्धा सांगण्यात येत असतात. उन्हाळा म्हटला म्हणजे नकोसा वाटतो. परंतु, यातून अनेकांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. तसेच काहीसे चित्र तळोदा शहरात दिसून येत असून अनेकांची रसवंती व सिकंजी दुकाने थाटली असून यातून उदरनिर्वाह भागवीत आहेत.
ठिकठिकाणी दुकाने
ब्रँडेड शीत पेयांची जाहिरात बाजी जोरात असतांना देखील श्रीमंतांपासून साधारण व्यक्तीपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांची पसंती स्वदेशी पेय असलेले ताजा ऊसाचा रस व साखरेचा पाकापासून व लिंबू रसापासून बनवलेली सिकंजी पसंत करतांना दिसून येत आहेत. एके काळी आईस्क्रीम , कोनसाठी हट्ट धरणारी बालक मंडळीसुध्दा आपल्या पालकां सोबत खास सिकंजी पिण्यासाठी येत असल्याचे दृश्य तळोदा शहरात दिसून येत आहे.