तळोदा । वृक्ष लागवडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यांसाठी वनविभागाकडून एक फिरता चित्ररथ तयार करण्यात आला असून या चित्ररथाचा माध्यमातून संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचे महत्व, वृक्षांचे संवर्धन याबाबत माहिती देण्यात येत आहे. या चित्ररथाचे तळोदयात काल आमदार उदेसिंग पाडवी व माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात आले आणि हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड संदर्भात जनजागृती व्हावी यांसाठी फिरता चित्ररथ तयार करण्यात आला असून, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाहस्ते नागपूर येथे रथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे.
आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले मार्गदर्शन
यावेळी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितले की, चित्ररथाचे स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे कारण वृक्ष लागवडीचा उपक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असून या उपक्रमात 33 शासकीय विभाग सहभागी होत आहेत. वृक्षतोडमुळे सर्वत्र पर्यावरणाचा समतोल ढासाळला आहे आणि त्यांचे वाईट परिणाम सर्वांना जाणवत आहेत, त्यामुळे या उपक्रमांत सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावयाचा आहे. तसेच या कार्यक्रमांतंर्गत 2018 मध्ये 13 कोटी तर 2019 मध्ये 33 कोटी रोपे लावण्याचे नियोजन आहे असे यावेळी सांगितले. तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले की, मी स्वतः एक रोप वाटिका तयार केली असून, अनेक ठिकाणी स्वतः वृक्ष लागवड करुन वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे महत्व पटवून दिले आहे. तसेच वनविभागाने उद्दीष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि वृक्ष लागवडी सोबतच वनसंवर्धन ही महत्त्वाचे आहे व तसे झाले तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनक्षेत्रपाल अशोक पाटील व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
चित्रफीत दाखवून वनसंवर्धनाबाबत दिली माहिती
या चित्ररथाचे काल तळोदयात आगमन झाले आणि चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी नगराध्यक्षा रत्ना चौधरी, तहसीलदार योगेश चंद्रे, उपवनसरंक्षक ए.टी. थोरात, सहाय्यक वनसरंक्षक एस.ए.अहिरे, सुभाष चौधरी, गौरव वाणी, हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, शिरीष माळी, भास्कर मराठे, प्रा.अशोक वाघ, दिवाकर पवार आणि वनविभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. या चित्ररथाची संपूर्ण शहरातून मिरवणुक काढण्यात आली.