तळ्यात-मळ्यात आणखी किती दिवस!

0

गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या की, आंबेडकरी कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असतात, आंबेडकरी जनतेला देखील प्रश्‍न पडतो की, निवडणुकीत आमच्या पक्षाचे स्थान काय? असे अस्तित्वाचे प्रश्‍न निर्माण झालेले असतांनाच गटातटात विभागलेले तथाकथीत नेते मंडळी कुठल्यातरी पक्षाशी आघाडी करतात किंवा इतरांच्या भरवशावर बसुन उमेदवारी मिळविण्यातच धन्यता मानतात. धर्मनिरपेक्ष भुमिका राहिलेला रिपब्लिकन पक्षाला कुणाच्याही दावणीला बांधुन सोईचे राजकारण करत आंबेडकरी जनतेची, चळवळीतील कार्यकर्त्यांची वर्षानुवर्षे फसगतच होण्याचीच पुनरावृत्ती होत आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील मुळ रिपब्लिकन पक्ष आकारच घेऊ शकलेला नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय चळवळीला धर्मनिरपेक्ष विचार सरणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नामविधान दिले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निळ्या निशाणाखाली सर्व आंबेडकरी समुदायाने एकजुटीने संघर्ष करुन आपल्या हक्कांसाठी जागृत रहावे ही त्या महामानवाची अपेक्षा होती. पण त्यांच्या पश्‍चात तथाकथीत रिपब्लिकन नेत्यांनी आजपर्यंत अनेक गट-तट निर्माण करुन संघर्ष शक्तीलाच सुरुंग लावण्याचे काम केले त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या की, आंबेडकरी कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असतात, आंबेडकरी जनतेला देखील प्रश्‍न पडतो की, निवडणूकीत आमच्या पक्षाचे स्थान काय? असे अस्तित्वाचे प्रश्‍न निर्माण झालेले असतांनाच गटातटात विभागलेले तथाकथीत नेते मंडळी कुठल्यातरी पक्षाशी आघाडी करतात किंवा इतरांच्या भरवशावर बसुन उमेदवारी मिळविण्यातच धन्यता मानतात.

धर्मनिरपेक्ष भूमिका राहिलेला रिपब्लिकन पक्षाला कुणाच्याही दावणीला बांधून सोईचे राजकारण करत आंबेडकरी जनतेची, चळवळीतील कार्यकर्त्यांची वर्षानुवर्षे फसगतच होण्याचीच पुनरावृत्ती होत आहे. हे असेच सुरु राहिले तर कार्यकर्त्याला न्याय मिळेल कधी? तो मोठा होईल कधी? त्याच्या स्वप्नांच्या पुर्ततेचे काय? कार्यकर्त्याने नुसते नेत्यांचा प्रचार, सभांच्या आयोजनातच गुंतून आपल्या संसाराची राख रांगोळी करायची की काय याचा विचार कोण करणार? ही सामाजिक जबाबदारी तथाकथीत नेते मंडळींची नाही काय? याचा विचारही होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील मुळ रिपब्लिकन पक्ष आकारच घेऊ शकलेला नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व क्षीण होत चाललेले आहे. रिपब्लिकन पक्षाचे पडलेले गट हे आंबेडकरी जनतेला कदापि मान्य नाहीत म्हणून जनतेचा नेहमी ऐक्याचा नारा राहिलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याबाबत आंबेडकरी जनता संवेदनशील आहे. रिपाइं ऐक्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, नामवंत कलावंत मंडळींनीही ललकारी देत ऐक्याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला, याच रेट्याला साद-प्रतिसाद देत बरेच चढ उतार रिपब्लिकन पक्षाने अनुभवले परंतू 1996 सालची लोकसभेची निवडणूक रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. ती निवडणूक रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येत ऐक्याच्या माध्यमातून लढवली खरी पण जरी पक्षाला यशाला गवसणी घालता आली नसली तरी, मतदारांनी दाखविलेल्या विश्‍वासातून, पक्षाला पडलेल्या मतांच्या जोरावर बरेच दिवसानंतर पक्षाला प्रादेशिक मान्यता मिळाली तसेच उगवता सूर्य ही निवडणूक निषाणी मिळाली. या निवडणुकीमुळे रिपब्लिकन पक्षाची एकत्रित ताकद समोर आली.

रिपब्लिकन पक्षाची शक्ती अनेक लढ्यांतून समोर आलेला आहे. बरेच मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक लढे उभारुन उपेक्षितांना न्याय देण्याचे काम रिपब्लिकन पक्षाने केलेले आहे. आंबेडकरी समुदाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांप्रती निष्ठा ठेवून आहे व त्या निष्ठेचा वर्षानुवर्षापासून रिपब्लिकन नेते मंडळी गैर फायद घेत आहेत अशी भावना आता सर्व सामन्यांची होणे साहजीकच आहे. स्वार्थापोटी आणि नेतृत्वासाठी आपआपसात संघर्ष करुन गटा-तटाच्या राजकारणात पक्ष सध्या गुरफटला आहे. त्यामुळे सध्या पक्षाची दयनिय अवस्था झालेली आहे. ती रिपब्लिकन नेत्यांना दिसू नये याला काय म्हणावे. रिपब्लिकन पक्षाचे अनेक वेळा ऐक्य झाले तसेच विभाजनही झाले त्यामुळे, दृढ निष्ठा, सामजिक जाणीव, समाजाप्रती असलेली कळवळ आणि तळमळ यांना जागुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील शासनकर्ती जमात होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जावून अस्तित्वाच्या लढाईत आता ऐक्याचा निळा ध्वज हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही. एकमेकांना पुरक राजकारण करत आपले अंतर्गत मतभेद बाजुला सारुन राजकीय सत्तेच्या किल्ल्या हाती घेत ऐक्य अबाधीत ठेवण्यासाठी व आंबेडकरी जनतेच्या आवाज बुलंद करण्यासाठी ठोस आणि ठाम निर्णय घेत, शासनकर्ती जमात बनन्याचे महामानवाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी स्विकारा.

– सुषलर भालेराव
9860074600