तवेरा गाडी चोरून नेणारे दोघे ताब्यात

0

धुळे। चाळीसगाव रोडवरील एका अ‍ॅटो कन्सल्टंटच्या दारात उभी असलेली तवेरा गाडी चोरुन नेणार्‍या दोघांना गाडीसह हुडकून काढण्यात गाडी मालकाला यश आले असून या दोघांना चाळीसगावरोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रोडवर कसबा अ‍ॅटो कन्सल्ट या वाहन खरेदी-विक्रीच्या दुकानात दि.28 रोजी दोन इसम रात्री 8 च्या सुमारास आले. त्यांनी चारचाकी गाडी दाखविण्यास सांगितले. मात्र मालक साबीर शहा यांनी सध्या रमजानचा महिना सुरु असून रात्रही झाली असल्याने तुम्ही उद्या सकाळी या तुम्हाला गाडी दाखवतो, असे सांगितले. कसबा अ‍ॅटो कन्सल्ट व साबीर शहा यांचे घर आणि दुकान हे एकमेकांना लागून असल्याने शहा यांनी आतुन शटर लावून घेत दुकान बंद केले.

आणखी वाहनचोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता
मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांच्या दारात उभी असलेली एम.एच.18/डब्ल्यू-1151 ही लाल रंगाची तवेरा गाडी बेपत्ता झाल्याचे आढळून आले. शिवाय एका विनानंबरची मोटरसायकल त्यांच्या दारात लावलेली असल्याने रात्री मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनीच तवेरा लांबविली असावी, असा संशय शहा यांना आला. त्यांनी त्यावेळपासून चोरीस गेलेल्या तवेराचा शोध सुरु केला होता. अखेरीस काल रात्री ही गाडी हॉटेल वालचंद बापूजीच्या आवारात लावलेली आढळून आली. शिवाय ज्यांनी ती चोरुन नेली होती ते देखील दारुच्या नशेत धूत असल्याने तेथेच सापडले. साबीर शहा यांनी गाडीसह त्या दोघांना चाळीसगावरोड पोलिसांच्या हवाली केले असून या दोघांकडून आणखी काही वाहनचोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे