तवेरा पलटल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार

0

एरंडोल । भरधाव वेगाने जाणारी तवेरा गाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पलटी होऊन झालेल्या अपघातात तवेरा मधील पंचवीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर अन्य चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज 26 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणारी तवेरा (जी.जे.55 सी.जे.2144) ही पतारखेडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर पडलेले खड्डे चुकवतांना पलटी झाली.

विवाह सोहळ्यासाठी जातांना अपघात
तवेरा पलटी झाल्यामुळे त्यातील शाहरुख हाजी हिरा (वय 25, राहणार सुरत), हा तरुण जागीच ठार झाला. तर मुशीरखान अय्युबखान (वय 27), सोहेल नाझीम (वय 20) व समीरखान बिलील खान (वय 25) सर्व राहणार सुरत हे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त तवेरा गाडीतील प्रवासी ख्वाजा नगर मान दरवाजा सुरत येथून बुलाढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी जात होते. मयत शाहरुख हा हात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.त्याचे पश्चात आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत शकीर शेख शब्बीर यांचे तक्रारीवरून तवेरा चालक रहेमान खान बिसमिल्ला खान याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे तपास करीत आहेत.