फैजपूर । रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील 28 लाभार्थ्यांना जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये इंदिरा आवास योजनेंतर्गत भुखंड मंजूर करण्यात आले आहे. मात्र तहसिलदारांच्या आडमुठे धोरणामुळे व दुर्लक्षितपणामुळे लाभार्थी वंचित राहत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे फैजपूर येथील उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. पक्षातर्फे वारंवार आंदोलने करुनही आजपर्यंत रावेर तहसिलदार या लाभार्थ्यांवर अन्याय करीत असून वेळोवेळी खोटी आश्वासने व उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. यावरुन लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळू नये, अशी तहसिलदारांची मानसिकता दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
28 लाभार्थ्यांना ताबे पावती मिळावी
शासन गोरगरीबांना हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी विचाराधीन असतांना तहसिलदार हे शासनविरोधी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची सुध्दा पायमल्ली केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला. त्यामुळे तहसिलदारांनी कुठलीही दिरंगाई न करता 28 लाभार्थ्यांना ताबे पावती द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष विक्की तायडे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, यावल – रावेरप्रमुख सुरेश भालेराव, खलिल मिस्तरी, संजय बोदडे, देवानंद तायडे, सुधीर तायडे, प्रकाश आदिवाले, प्रदिप आदिवाले यांच्या स्वाक्षर्या आहेे.