बोदवड । तालुक्यातील 51 गावांच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी तहसील आणि पंचायत समितीवर आहे. मात्र, या दोन्ही कार्यालयांचे कामकाज सध्या वार्यावर आहे. दोन्ही कार्यालयांचे कामकाज रेल्वेच्या वेळापत्रकानुसार चालते. त्यामुळे दुपारी 4.30 वाजेनंतर दोन्ही कार्यालयांमध्ये शुकशुकाट होतो. त्यामुळे याठिकाणी ग्रामीण भागातून आपले काम घेऊन येणार्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे.
नागरिकांना परतावे लागते माघारी
सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45 अशी दोन्ही कार्यालयांची कामकाजाची वेळ आहे. मात्र, दोन्ही कार्यालयाचे बहुतांश कर्मचारी भुसावळ, जळगाव येथून रेल्वेने अपडाऊन करतात. त्यामुळे सायंकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेस पकडण्यासाठी कर्मचारी 4.30 वाजता निघून जातात. तसेच कर्मचार्यांकडून उर्मट वागणूक मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तहसीलदारही रजेवर असल्याने कर्मचार्यांना रान मोकळे आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी होत आहे. मात्र, कर्मचार्यांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.