मुक्ताईनगर । येथील तहसिल कार्यालय ते आनंद ट्रेडर्स पर्यंतचा रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर सर्व सरकारी कार्यालय तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय तसेच अनेक लहान मोठी कार्यालय असून देखील सदरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.
रस्ता झाल्यानंतर सुशोभिकरण करणार
या रस्त्याची फारच दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर बाहेरगावच्या लोकांचा तसेच सरकारी कर्मचारी, अधिकार्यांचा वापर असूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही व सदरच्या रस्त्याकडे कोणीही अधिकारी लक्ष देत नसून या रस्त्याची दुरुस्ती करुन पूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावे. आनंद ट्रेडर्सपासून ते तहसिल कार्यालय तसेच पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालयापर्यंत लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात यावा. तसेच या संपूर्ण रस्त्याच्या आजुबाजुला गजानन गणेश मित्रमंडळ यांनी सन 2015 मध्ये 100 वृक्षांची लागवड केलेली आहे. ते वृक्ष आजरोजी 10 ते 15 फुटांपर्यंत वाढलेली आहे. तसेच या संपूर्ण रस्त्यावर नवीन रस्ता बनविल्यानंतर डस्टबीन ठेवणे, झाडांना कुंडी करणे, रस्त्याच्या आजुबाजुला फुलझाडे लावून रस्त्याचे सुशोभिकरण करण्याची जबाबदारी गजानन गणेश मित्रमंडळ घेत आहे. तरी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी धनंजय सापघरे, संतोष सापघरे, बबलू सापघरे, वसंत भलभले, अमरदीप पाटील, संतोष शेवाळे, सोनू काचकुटे, सुरेश मलवाले, सुभाष दैवे आदी उपस्थित होते.