एरंडोल । येथील तहसिलदार सुनीता जर्हाड व निवासी नायब तहसिलदार आबा महाजन यांच्या संकल्पनेतून येथील तहसीलदार कार्यालय अत्यंत बोलके झाले आहे. तहसीलदार सुनीता जर्हाड व निवासी नायब तहसीलदार आबा महाजन यांनी आदर्श अशी संकल्पना राबवून महसूल खात्यांशी संबंधित विविध बोधकथांच्या आकर्षक फ्रेम करून त्या कार्यालयाच्या भिंतीवर लावल्या आहेत. बोधकथांच्या फ्रेममुळे नागरिकाना संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सदरच्या बोधकथा लिहिल्या आहेत. सदरच्या बोधकथांमुळे ग्रामीण भागातील वहिवाट, बांधांचे वाद, वाटणी, जमीन अतिक्रमण, कुळकायद्यातील वाद आदी समस्या दूर होण्यास मदत होईल.
गरजूंच्या अडचणी कमी होण्यास मिळणार मदत
सर्व समस्यांमुळेच ग्रामीण भागात वाद होत असतात. या वादांवर आधारित या जमीन व्यवहार नीतिकथा आहेत. त्यामुळे शेतकर्यारना मार्गदर्शन मिळेल व त्यातून कोर्ट कचेरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमिनीच्या व्यवहारातून होणारे वाद कमी होण्यास मदत होईल.यासर्व बोधकथांमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत कायदा,कायद्याचे तत्व, नियम समजावून सांगितले आहेत. यामुळे शेतकर्यांना सर्व बाबींची माहिती उपलब्ध झाली आहे. तहसीलदार कार्यालयाने राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. तहसिल संबंधी कामांशी पहिल्यांदाच संबंध आलेल्यांना या गोष्टीरुपी संदेशाचा लाभ होणार आहे. गोष्टी रुपात असल्याने समजायला सोपे जात आहे. त्यामुळे वेळेत आणि श्रमात बचत होत आहे.
तहसील कार्यालयात लावण्यात आलेल्या बोधकथांमुळे ग्रामीण भागातील वाद कमी होण्यास मदत होईल. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
– सुनीता जर्हाड, तहसीलदार एरंडोल
पाचोरा येथे निवासी नायब तहसीलदार पदावर कार्यरत असताना प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांचे समवेत हा कल्पक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. राज्यातील पहिला प्रयोग पाचोरा येथे करण्यात आला. त्यानंतर एरंडोल येथे बदली झाल्यामुळे सदरचा उपक्रम एरंडोल येथे राबविण्याचा संकल्प करून बोधकथांच्या फ्रेम तयार करून भिंती बोलक्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सुनील मंत्री, नायब तहसीलदार विलास मोरे व सि.बी.देवराज यांचे सहकार्य लाभले.
– आबा महाजन, निवासी नायब तहसीलदार