तहसीलदारही फसले फेक कॉलला

0

अमेठी । फोनवरून सर्वसामान्यांना ठकवल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत असतो. पण केवळ सर्वसामान्यांना आणि अल्पशिक्षितांनाच हे ठक ठकवतात, असा जर तुमचा समज असेल, तर तो साफ चुकीचा आहे. ठकवणारे कुणालाही ठकवू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये चक्क तहसीलदाराला ठकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक त्रिपाठी हे अमेठी तहसीलमध्ये महसूल विभागात नायब तहसिलदार या पदावर काम करतात. त्यांना एक फोन आला. कुणीतरी सुनील वर्मा हा व्यक्ती एसबीआयच्या मुख्यालयातून बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. केवाईसी संदर्भात बोलायचे असल्याचे सांगून त्याने तहसीलदाराकडून बँक अकाउंटची सर्व माहिती काढली आणि त्यांच्या अकाउंटमधून 50 हजारांची रक्कम लंपास केली. यासंदर्भात दीपक त्रिपाठी यांनीकोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दीपक त्रिपाठी हे कार्यालयात असताना त्यांना एसबीआय मुख्यालयातून बोलतोय असा एक फेक कॉल आला. फोन करणार्‍या व्यक्तिने स्वतःचे नाव सुनील वर्मा असे सांगितले. त्याने सुरुवातीला तहसीलदाराला त्यांच्या आधार कार्ड नंबर विचारला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एटीएमवरचा 16 अंकी नंबर मागितला. वेळोवेळी बँक जनजागृती करून सांगत असते की बँक कुणालाही वैयक्तिक माहिती किंवा कुणाचा पासवर्ड विचारत नाही. मात्र, फेक कॉलला तहसीलदार साहेब धडाधड उत्तर देत होते. जेव्हा समोरून त्यांना एटीएमचा पासवर्ड विचारण्यात आला तेव्हादेखील त्यांनी तो दिला. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचे बँक खाते हे सॅलरी अकाउंट असल्याचे न विचारताच सांगितले. संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर पाच एसएमएस आले. त्यात त्यांच्या अकाउंटमधून 5 वेळा 10 हजार रुपये काढल्याचा मेसेज होता. जेव्हा त्यांनी अकाउंट चेक केले, तर तेव्हा त्यांचे अकाउंट रिकामे झालेले दिसले. त्यानंतर त्यांना कळलं की त्यांना ठकवण्यात आलं. त्यांनी लगेच याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.