मुक्ताईनगर- तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबाने शेत वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध न झाल्याने 19 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. सायंकाळी उशिरा तहसीलदार मनोज देशमुख यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त उपोषण मागे घेण्यात आले. तक्रारदार रामदास गणू कोळी तसेच विजय रामदास कोळी, वामन रामदास कोळी, राजू रामदास कोळी, रुखमाबाई रामदास कोळी, उषा विजय कोळी, वर्षा वामन कोळी व कविता राजू कोळी हे चिंचखेडा बुद्रुक येथील रहिवासी असून शेताचा वहिवाटीचा रस्ता मिळावा यासाठी मुलांसह तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.
23 पर्यंत प्रश्न निकाली निघणार
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये अर्जदार रामदास गणू कोळी यांनी रितसर अपील तहसीलदार यांच्याकडे दाखल केले होते. या प्रकरणी घटनास्थळ पंचनामा व संबंधितांची जाब-जवाबदेखील नोंदवलेल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद देखील पूर्ण झालेला आहे. तथापि सामनेवाले या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याचे बहाने दाखवत असून उघडपणे न्यायासनासमोर त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दाखवत आहेत त्यामुळे ही केस प्रलंबित होऊन आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कोळी कुटुंबाची झाल्याने त्यांनी 19 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी उशिरा तहसीलदार मनोज देशमुख यांनी ते 23 तारखेपर्यंत उपोषण स्थगित ठेवावी तोपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सायंकाळी उशिरा स्थगित करण्यात आले.