भुसावळ । जुन्या तहसील कार्यालयात असलेले सेतू सुविधा कक्ष नवीन तहसील कार्यालयाच्या परिसरात हलवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सेतू कार्यालय आणि तहसीलमध्ये जाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सेतू कार्यालय नवीन तहसीलमध्ये स्थलांतरीत होणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत सध्या सेतू सुविधा कक्ष सुरू आहे. तर तहसील कार्यालय जळगाव रोडवरील नवीन इमारतीत आहे. त्यामुळे अर्जदारांना दाखला तसेच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सेतू कार्यालय आणि तहसीलमध्ये वारंवार जावे लागते. उन्हाच्या तीव्रतेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रदेखील नवीन तहसीलमध्ये सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे गैरसोय दूर होईल. जून महिन्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक दाखले काढण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे समस्येची त्वरीत दखल घ्यावी.