भामेर (तनवीर शेख) । जूून महिना जवळ जवळ संपण्यास आला तरी अद्यापही या परिसरात पावसाचे आगमन झालेले नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. आता पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे पाहत आहे. पावसाच्या हुलकावणी बळीराजा चिंता वाढली आहे. काही दिवसापासून भामरेसह निजामपूर, स्कडाणे,आखाडे, वासखेडी, दुसाणे, म्हसाळे, रायपूर, वळसाणे, शिवाजीनगरच्या शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. बि-बियाणे शेतकर्यांनी खरेदी केले आहे. जमिनी पेरणीसाठी सज्ज करून ठेवण्यात आल्या.
या भागात कापूस पिकाला शेतकरी प्राधान्य देत त्या व्यतिरिक्त गहू, बाजरी, ज्वारी, भुईमुग, कडधान्यासह खरीप हंगामाची पिके घेण्यासाठी शेतात निर्माण झालेला कचरा साफ करून शेती पेरणी योग्य केली आहे. यंदा शेतात घेण्यात आलेले उत्पादन गत वर्षांपेक्षा जास्त झाले पाहिजे या अपेक्षेने जमीन कसून ठेवली आहे. कोणती पिके घ्यावी याचे नियोजन शेतकरी करत आहे. बियाणे कोणते खरेदी करावे, अशा संभ्रमात शेतकरी आहे. शेतजमिनीची क्षमता पाहूनच शेतकरी निर्णय घेत आहे. आता शेतकरी मान्सून आगमनाची वाट पाहत आहे. जुन अर्धा संपला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातून झाला असून खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे कृषी केंद्रामध्ये ही शुकशुकाट जाणवत आहे. अद्यापपर्यंत परिसरात पाऊस पडलेला नसल्याने शेतकर्यांना खरीप हंगामातील शेतीकामांना खोळंबा झाला असून पेरण्या लांबल्या आहेत. पावसाने वरील शेतीची कामे रेंगाळली आहेत. यंदा पाऊस बर्यापैकी राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविले होते. तरी या भागात पावसाला सुरूवात झालेली नसल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. खरीप हंगाम अडचणीत येण्याच्या भितीने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.गेल्या उन्हाळ्याची झळ सर्वत्र चांगलीच बसली. उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे स्त्रोत कमी झाले. पाण्यासाठी सर्वांना वणवण करावी लागली. कधी उन्हाळा संपेल व पावसाळा सुरू होईल, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु जून महिना अर्धा पंत आल्यावरही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे परिसरात पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने शेतकरी बांधव पावसाची प्रतिक्षा करीत आहे.परिसरात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.पावसाच्या आगमनाच्या अपेक्षेने शेतकर्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची सर्व कामे वेळेत आटोपली. मात्र तब्बल दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळेच तहानलेल्या भूमीसह शेतकरीही पावसाची वाट पाहत आहे.