अमळनेर । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने खातेदार शेतकर्यांना एटीएम कार्ड सक्तीचे केले आहे. बँकेच्या आग्रहाने प्रत्येक खातेदाराला एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. शेतकरी एटीएम कार्डचा वापर करत आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे बँकांचे एटीएम नेहमीच बंद राहत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच खात्यातील पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांचे हाल होत आहे. तसेच खात्यातील रक्कम न मिळता परस्पर वजा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शेतकर्यांनी बँकाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र तक्रार करुन दिड महिना उलटल्यावरही कारवाई होत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. अमळनेर तालुक्यातील जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या शेतकर्यांना बचत खात्यातुन पैसे काढतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
एटीएम सक्तीचे केल्याने अशिक्षीत शेतकर्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो आहे. याविषयी जिल्हा बँक शाखेत लेखी तक्रारी दाखल करण्यात आली आहे. बँक व्यवस्थापनाने ज्या शेतकर्याांच्या खात्यातून खरोखरच रक्कम वजा झाली आहे अशांची चौकशी करुन वजा झालेली रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. शेतकर्यांनी जिल्हा बँक संचाल अनिल भाईदास पाटील यांची भेट घेऊन त्यांना संबंधीत बाब लक्षात आणुन दिली. अनिल पाटील यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधुन जाब विचारला. देशमुख यांनी पडताळणी शेतकर्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. बॅँकेतील 5 लोकांची टीम तयार करुन सदर प्रक्रिया लवकर राबविण्याची सूचना अनिल पाटील यांनी केली.