जळगाव- शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ महापालिकेच्या जुन्या सार्वजनिक शौचालयांचे पाच दरवाजे लंपास झाल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. याप्रकरणी आरोग्य निरिक्षक आनंदा किशोर सोनवाल यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाचे पथक जळगावात येणार असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नादुरुस्त अवस्थेत असलेल्या शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली होती. यात तांबापुरा परिसरातील खदानीजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयांचे 13 फेब्रुवारी रोजी दरवाजे बदलण्यात आले असल्याचे समजते. मात्र त्याला महिना उलटत नाही तोच या सार्वजनिक शौचालयांचे पाच दरवाजे चोरट्यांनी लांबवून नेले आहे. 16 मार्च ते 18 मार्च दरम्यान चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोग्य निरिक्षक आनंदा किशोर सोनवाल यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय निंबाळकर करीत आहेत.