पोलिसांकडून परिस्थितीवर वेळीच नियंत्रण
मुंबईला कार्यरत पोलीस कर्मचार्यांचे लग्न
जळगाव : मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत कर्मचार्यांच्या लग्नाच्या वरातीवर तांबापुरा येथील बिलाल चौकात दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यामुळे पळापळ होवून तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रोहित संजय गडकर या मेहरुणमधील दत्त नगरातील रहिवाशी तथा मुंबई पोलीस दलात नोकरीला असलेल्या तरुणाचा मंगळवारी विवाह होता. दुपारी दीड वाजता त्यांची वरात वाजत गाजत निघून महामार्गावरील लाडवंजारी मंगल कार्यालयात जात असताना बिलाल चौकातील प्रार्थना स्थळाजवळ काही तरुणांनी या वरातीत अचानक जोरदार दगड व विटांचा मारा सुरु केला.
दगडफेकीत बालक जखमी
अचानकच्या दगडफेकीने वरातीतील सर्व मंडळी तसेच इतर नागरिकांची पळापळ झाली. या दगडफेकीत एका बालकाला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान या प्रार्थनास्थळाच्या समोरच लोटन गिरधर पाटील यांचे घर आहे. या गोंधळात काही तरुणांनी पाटील यांच्या घरावरही दगड व विटांचा मारा सुरु केला. त्यामुळे घरातील मंडळींमध्ये भिती निर्माण झाली.
गेल्या काही वर्षांच्या घटना ताज्या
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये तांबापुर्यात झालेल्या दंगलीच्या घटना मंगळवारी दगडफेकीन ताज्या झाल्या. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठले. जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तसेच दगडफेक करणार्यांचा शोध घेतला. प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरु असल्याने तेथीलच विटांचा मारा तरुणांनी केला. दरम्यान दगडफेक करणारे दोन तरुण निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.