ताजमहलचे नाव राममहल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

0

लखनऊ-आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी यावेळी ताजमहलचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बेरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ताजमहलचे नाव राम महल किंवा कृष्ण महल केले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

आपल्या मागणीच्या समर्थनात सुरेंद्र सिंह म्हणाले की, जर कोणी भारतीय साधनांचा किंवा इथल्या मातीने एखादे स्मारक बनवले असेल तर ते स्मारक भारताचे आहे. त्याला कोणी आपले नाव देत असेल तर ती चांगली गोष्ट नाही. ताजमहलचेही नाव बदलले पाहिजे का, असे त्यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ताजमहलचे नाव बदलून राम महल किंवा कृष्ण महल केले पाहिजे. जर माझ्या हातात असते तर मी ताजमहलचे नाव बदलून राष्ट्रभक्त महल असे ठेवले असते.

यापूर्वी अनेकवेळा सुरेंद्र सिंह यांनी आपल्या वक्तव्यांमुळे भाजपासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. त्यांनी आपल्याच पक्षाचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्यावर निशाणा साधत त्यांची तुलना वेश्येशी केली होती. पक्षाचे तिकीट विकून पैसे कमावल्याचा आरोप त्यांनी राजभर यांच्यावर केला होता. त्यांनी ओमप्रकाश राजभर ऐवजी ‘ओमप्रकाश घरभर’असे नाव ठेवले पाहिजे, असा उपहासात्मक टोला लगावला होता.