ताज्या मानांकन यादीत केर्बर अग्रस्थानाच्या समीप

0

दुबई : दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अँजेलीक केर्बरने मोनिका प्युएगचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. केर्बरने हा सामना तासाभराच्या कालावधीत जिंकला. या विजयामुळे आता महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत केर्बर अग्रस्थानाच्या समीप पोहचली आहे. जर्मनीच्या केर्बरने 2016 साली महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत पहिले स्थान मिळविले होते.

सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने केर्बरला पहिल्या स्थानावरून खाली खेचत अग्रस्थान घेतले होते. आता दुबईतील ही स्पर्धा जिंकली तर 29 वर्षीय केर्बर पुन्हा पहिले स्थान मिळवू शकेल. केर्बरनचा पुढील फेरीतील सामना कोंजूशी होणार आहे. कोंजूने आठव्या मानांकित व्हेसनिनाचा 3-6, 6-4, 7-6 (7-4), सातव्या मानांकित स्विटोलिनाने मॅकहॅलेचा 4-6, 6-4, 6-3, अमेरिकेच्या डेव्हिसने मॅकरोव्हाचा 4-6, 6-1, 6-3, चीनच्या क्युयांगने मॅलेडेनोव्हिकचा 6-1, 6-4, सेव्हास्टोव्हाने शुईचा 6-4, 6-3 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला.