भुसावळ (गणेश वाघ) : समाजातील कर्मठ लोकांकडून मिळणार्या वागणुकीनंतर श्री संत ज्ञानेश्वरांनी झोपडीवजा घराची ताटी लावून स्वतःला बंदिस्त करून घेतल्यानंतर धाकटी बहिण असलेल्या श्री संत मुक्ताईने श्री संत ज्ञानेश्वरांना बोध देत ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ अशी आर्जव केल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भुसावळात घडताना दिसून येत असून शांती नगरातील श्री संत ज्ञानेश्वरांच्या नावाने असलेल्या उद्यानाची दुरवस्था पाहता श्री संत मुक्ताईचे निस्सीम भक्त असलेल्या तथा माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी आता या उद्यानाची ताटी (दुरवस्था थांबवण्यासाठी) उघडण्यासाठी पुढाकार घेण्याची आर्त हाक भुसावळकरांनी दिली आहे.
उद्यान मोजतेय अखेरची घटका
1982 मध्ये श्री संत ज्ञानेश्वर यांचे नाव देवून स्थापन करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाची पार वाताहत झाली आहे. देखभाल व निगा राखली न गेल्याने या उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे़ कोट्यवधींच्या विकासाच्या गप्पा हाकणार्या सत्ताधार्यांसह प्रशासनाला उद्यानाच्या दुरवस्थेबाबत काही देणे घेणे नाही, असे एकूणच चित्र शहरात दिसून येत आहे. माजी मंत्री खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भुसावळकरांनी भरभरून मतांचे दान टाकत भाजपाला सत्ता दिली त्यामुळे गेल्या चार वर्षात विकासाचा आलेख उंचावला नसलातरी वर्षभरात विकास न दिसल्यास मतदारराजा सत्ताधार्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हेदेखील तितकेच खरे !
देखभाल न राखली गेल्याने दुरवस्था
शांतीनगर भागात पालिकेने मधल्या काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान विकसीत केले होते काही काळ हे उद्यान चांगल्या स्थितीत राखले गेले नंतर मात्र त्याची व्यवस्थीत देखभाल व निगा राखली न गेल्याने त्याची आजमितीला पूर्णत: वाताहत झाली आहे. उद्यानाला सर्वत्र गवताने वेढा दिला आहे तर स्वच्छता नसल्याने येथे कुणीही फिरकायला तयार नाही़ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर गवत तसेच झुडुपे आल्याने प्रवेशद्वारावरील नावही दिसेनासे झाले आहे़
बाकांची दुरवस्था
चिमुकल्यांना खेळण्यासाठी उद्यानात खेळण्यांचा अभाव तर आहेच शिवाय बसायलादेखील धड बाके नाहीत़ आहे ती बाकेदेखील तुटलेल्या अवस्थेत उद्यानात पडलेली दिसून येतात़ उद्यानात असलेला डिजिटल कारंजा बंदावस्थेत आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल कारंजा बंदावस्थेत असून त्यावरील लाईटस् खराबझाले आहेत़ कधी काळी उद्यानात येणार्या चिमुरड्यांसह वयोवृद्धांना डिजिटल कारंजाचे आकर्षण होते, मात्र ते काही वर्षच ठिकले़ नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिकेचा दरवर्षी सुमारे दोनशे कोटींवर अर्थसंकल्प असलातरी अवघ्या तीन उद्यानांची वाताहतही थांबवण्यास पालिका प्रशासन व सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले आहेत़
उद्यानातील बहुतांश दिवे बंदने गैरसोय
उद्यानातील बहुतांश पथदिवे बंद आहेत शिवाय सौर ऊर्जेवरील पथदिव्यांच्या बॅटरी चोरीस गेल्या आहेत़ पालिका प्रशासनाने तातडीन ेया संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी व उद्यानातील समस्या निकाली काढाव्यात, अशी अपेक्षा या भागातील नागरीकांची आहे़ श्री संत ज्ञानेश्वर उद्यान आजमितीला मद्यपींचा अड्डा बनू पाहत आहे़ बंदिस्त उद्यानात कुणाचाही वावर नसल्याने मद्यपींसाठी ही आयतीच संधी चालून आली आहे़ उद्यानातील विविध भागात दारूच्या रीकाम्या पडलेल्या बाटल्या दिसून आल्या़
सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे
उद्यानांची वाताहत थांबवण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे़ लोकसहभागातूनही या उद्यानांची वाताहत थांबवता येणे सहज शक्य आहे. किमान उद्यानांची स्वच्छता होऊन खेळण्याची डागडुजी झाल्यास उन्हाळी सुट्यांमध्ये आबालवृद्धांची मोठी सोय होणार आहे़ शहरातील सामाजिक कार्य करणारे विविध क्लब आहेत त्यांच्या पदाधिकार्यांनी एकत्र येत उद्यानांची दुरवस्था थांबवण्यासाठी पुढाकार घेतल्यास निश्चित बदल घडणे शक्य आहे.