ताडपत्री बांधताना विजेचा धक्का लागून तरूण गंभीर

0

जळगाव। विद्युत खांब्याला ताडपत्री बांधत असतांना तरूणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना गुरूवारी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास फुलेमार्केटमध्ये घडली. यात तरूण गंभीर जखमी होवून भाजला गेला. दरम्यान, तरूण डिपीला चिपकताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत लाकडी दांड्याचे मदतीने त्याला बाहेर ओढले आणि त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृति चिंताजनक असल्यामुळे त्याला तातडीने खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे विद्यूत तारांमधील विज खांब्यात उतरल्याने ही घटना घडली घडली.

कुटूंबियांचा जिल्हा सामान्य रूग्णालयात आक्रोश
विशाल दादाराव शिंदे (वय-22) हा कुटूंबियांसोबत शिवाजीनगरात राहतो. तर विशाल हा शहरातील फुलेमार्केटमधील अंकूश पवार यांच्या कपड्यांच्या दुकानावर कामाला आहे. गुरूवारी नेहमीप्रमाणे विशाल हा कामाला आला. त्यानंतर दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास विशाल हा दुकानाजवळच असलेल्या विद्युत डिपीच्या खांब्याला पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून ताडपत्री बांधत होता. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे खांब्यात विज उतरल्या असल्यामुळे त्याचा स्पर्ध खांब्याला होताच त्याला विजेचा जोरधार धक्का बसला. यात तो डिपीला चिपकला गेला. फुले मार्केटमधील दुकानधारक शरीफ शेख मनियार, अखील भाई, इरफान शेख, सागर जगताप, राहू चौधरी, गुड्डू मिश्रा यांना विशाल डिपीला चिपकलेला दिसताच त्यांनी लाकडी दांडे घेवून त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर शरीफ शेख यांनी लाकडी दांड्याने विशालला धक्का देवून डिपीपासून दुर ढकलले. परंतू विशाल 40 ते 50 सेंकदापर्यंत डिपीला चिपकूनच असल्यामुळे तो त्यात भाजला गेला.

मार्केटमधील दुकानधारकांनी व नागरिकांनी लागलीच विशालला जखमी अवस्थेत रूग्णवाहिकेतून नेऊन जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांकडून लागलीच विशालवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मुलाला शॉक लागल्याची माहिती कुटूंबियांना मिळताच त्यांनी जिल्हा रूग्णालात धाव घेत एकच हंबरडा फोडला. तर जखमी मुलाला पाहून आईने मनहेलवणारा आक्रोश केला. विशालची प्रकृति चिंताजनक वाटल्याने त्याला लागलीच शाहुनगरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी दुकानधारकांनी व विशालच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.