जळगाव : तालुक्यातील भादली येथील 40 वर्षीय इसमाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दि. 27 रोजी मध्यरात्री भादली नशिराबाद रेल्वे गेटच्या जवळ घडली. नरेंद्र मुरलीधर नारखेडे(वय 40) असे मयताचे नाव असून मुलीच्या लग्नाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र नारखेडे हे भादली येथील नारखेडे वाड्यातील रहिवासी असून जळगाव शहरातील रतनलाल बाफना ज्वेलर्समध्ये कामाला होते. 27 रोजी सायंकळी बाहेरुन फिरुन येतो असे म्हणत ते घरातून निघून गेले होते. रात्री 8 वाजेपर्यंत नरेंद्र नारखेडे हे घरे परतले नसल्याने घरात चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर पत्नीने त्यांचा भाचा कपील पाटील (नशिराबाद) यांना फोन करत पती नरेंद्र नारखेडे हे तुमच्याकडे आले आहेत का? असे विचारणा केली. व ते बाहेरुन अद्यापही घरी आले नसल्याची माहिती दिली.
शोध घेतला असता रेल्वेरुळावर आढळला मृतदेह
भाचा कपील पाटील यांनी भादली गाठत मामा नरेंद्र नारखेडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास रेल्वेळावर कर्तव्यावर असलेले ट्रॅकमॅन यांना नरेंद्र हे घरातून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेत असल्याचे सांगितले. यावर रेल्वे ट्रॅकमन यांनी बॅटरी चमकवित पुढे काही अंतरावर एका इसमाने आत्महत्या केली अशी माहिती देत मृतदेह दाखविला. त्यानंतर कपील पाटील यांनी मृतदेह ओळखल्याने मयत हे नरेंद्र नारखेडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. येथे मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत नरेंद्र नारखेडे यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी रवींद्र इंधाटे, मोहन चौधरी हे करीत आहे.