तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश

0

जळगाव। आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना रक्तातील नातेवाईकांना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अनेक अडचणी येतात. विशेषतःखान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील समाजबांधवांना अशी अडचण येत आहे. ही अडचण सोडविण्यात येऊन रक्तातील नातेवाईकांचा पुरावा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदीवासी टोकरे कोळी समाज बांधवांना रक्तातील नातेवाईकांना येत असलेली अडचण सोडवून अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

येत्या 15 दिवसात परिपत्रक काढण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्याने केली आहे. प्रभाकर सोनवणे यांनी बुधवारी 12 जुलै रोजी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालांचे न्यायनिवाडे सभापती सोनवणे आणि वकील अ‍ॅड.वसंत भोलाणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.