ताथवडेकरांना मिळकतकर माफी द्यावी

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील मिळकतकर रद्द असताना ताथवडे गावाचा समावेश केवळ आदेशात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ताथवडेतील नागरिकांच्या करमाफीचा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित असताना महापालिकेकडून सक्तीची करवसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुले ताथवडे परिसरातील मिळकतींना शासनाच्या धोरणानुसार मिळकतकर माफी देण्यात यावी, याबाबत स्थानिक नागरिकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र दिले आहे.

ताथवडेचा समावेश नंतर
30 जुलै 2009 मध्ये ताथवडेचा महापालिकेत समावेश करताना कमीत कमी कर आकारला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. शासनाच्या निर्णयानुसार 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या मिळकतकर थकबाकीमध्ये करमाफी देण्यात आली आहे. ताथवडे गावाचा समावेश नंतर झाल्यामुळे संबंधित निर्णयामध्ये गावाचा समावेश नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

अव्वाच्या सव्वा बिले
2015-16 या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिकेने मिळकतकराचे दर निश्चित केले. त्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर केली होती. 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या गावांना करमाफी दिली. त्याप्रमाणे ताथवडेचाही विचार करावा, म्हणून ठराव करून तत्कालीन आयुक्त यांनी नगरविकास विभागाकडे पाठविला. त्यावर शासनाने निर्णय दिलेला नाही. प्रशासनाने करवसुली सुरू केली. वाढीव मिळकतकरांची बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यातच प्रशासनाने जप्तीच्या नोटिसा दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

पूर्वीच्या 17 गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात करण्यात आला. त्यावेळी मिळकत करातून सवलत दिली होती. ताथवडेचा समावेश केला; त्यावेळी महापालिका अधिनियम कलम 129 ‘अ’ नुसार गावाचा महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्या वेळी कमी दरात सामान्यकर आकारणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, वाढीव दराच्या बिलांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच जप्तीच्या नोटिसाही दिल्या आहेत. ताथवडे गावातील मिळकतींना आकारलेल्या करातून माफी द्यावी. यावर महापालिका आणि राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे.
-मयूर कलाटे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 25.