‘तान्हाजी’ जबरदस्त घौडदौड; १२ दिवसात जमवला इतका गल्ला ?

0

मुंबई: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसत आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशी या चित्रपटाने 8.17 कोटींचा बिझनेस केला आणि काल 12 व्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली. यासोबतच ‘तान्हाजी’च्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत अजयचा हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे मानले जात आहे. या चित्रपटाचा बजेट 125 कोटी रूपये आहे. हा बजेट कधीच वसूल झाला आहे. सुमारे 3500 स्क्रिन्सवर रिलीज झालेला ‘तान्हाजी’ ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.

तान्हाजीसोबत दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ही रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपटात दिग्गज स्टार्स असल्याने दोन्ही सिनेमे एकमेकांना जोरदार टक्कर देतील, असा अंदाज होता. पण ‘तान्हाजी’समोर दीपिकाच्या ‘छपाक’चा फारसा टिकाव लागला नाही. दीपिकाच्या ‘छपाक’ची कमाई मात्र सुस्त आहे. अद्याप ‘छपाक’च्या 12 दिवसांच्या कलेक्शनचा अधिकृत आकडा आलेला नाही. पण जाणकारांच्या मते, 12 दिवशी या चित्रपटाने केवळ 40 लाखांचा बिझनेस केला. आत्तापर्यंतची चित्रपटाची कमाई 35 कोटी रूपये आहे. म्हणजे अद्याप 40 कोटींचा आकडाही या चित्रपटाला पार करता आलेला नाही.